Tuesday, 22 March 2022

बाळ


धावत राही, खेळत राही,

बाळ आमचा, थकत नाही

दिवसभर मस्ती, न थांबता करे,

तरी रात्री कशी, पोळी न सरे॥ध्रु॥


छोटा भीम पाहण्यात प्रचंड आनंद,

राक्षसांच्या भीतीने दरवाजे बंद,

टिव्ही पाहे, मन लावून,

पडती स्वप्ने, कार्टून पाहून॥


दोन दिवसात खेळणे जुने,

अनमोल त्याच्या कलेचे नमुने,

फावल्या वेळेत चित्रकलेची खोड,

जागा मिळेल तिथे रेषा ओढ॥


रागावल तर त्याची, रागाने आग,

माराल तर छेडतो शास्त्रीय राग,

शक्ती एकवटून रागाने पाही,

पुढल्या क्षणाला विसरून जाई ॥


कुस्ती खेळताना येई शक्ती अचाट,

प्रश्न विचारता, चालवी डोके भन्नाट

त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी फार,

गोष्ट ऐकताच, करे नवीन तयार ॥


बागेत गेल्यावर करे धमाल,

आनंद ओसंडून वाहे कमाल,

मोठ्यांना घोडा बनवून स्वार,

अति मस्ती करताच आईचा मार ॥


आजारी पडल्यावर शक्ती गुल,

सदाफुलीचे सुकलेले फुल,

साऱ्या घराचे त्याच्यावर लक्ष,

होतो दोन दिवसात तंदुरुस्त ॥


आजी आजोबा लावती शिस्त,

शुभम करोतीला जोडे हस्त,

मोठ्या माणसांवर बारीक नजर,

नक्कल करण्यात ना सोडे कसर ॥


घाबरवे मारून, वाघोबाची डरकाळी,

बिलगे आई बाबांना, ते येताच संध्याकाळी,

घरापासून शाळेत, तो सर्वाना हवा,

सर्व माणसाना, जोडणारा दुवा ॥


प्रत्येक गोष्टीत, शोधे गम्मत,

तुमची नजर हटताच करामत,

त्याच्यासाठी सगळे, होती लहान,

विसरून सारे, जीवनातले ताण ॥


जीवन आहे एकदाच, भातुकलीचा खेळ,

साजरा करायला,प्रत्येक क्षण योग्य वेळ,

तो जाणे केवळ,स्वतःचे तत्वज्ञान,

नसे ठावूक गडयाला, धर्म वा विज्ञान ॥


सगळ्यांना सतावून, राही गोजिरा,

प्रत्येक क्षण, सणासारखा साजरा,

हा दृष्टीकोन, आपल्यात येवो,

सारे दुःख-चिंता, पळून जावो ॥


मनात येईल ते, वाटेल तसे करे,

चूक कळताच, आईच्या कुशीत शिरे,

मानमरातब,स्वार्थ काही क्षण विसरा,

व्हाल सुखी, विना मिळता कुठला सदरा ॥


- कवी विद्यानुज

No comments:

Post a Comment