Tuesday, 29 July 2014

शेख कॅन्टीन

रामने मारली शामला हाक,
एक राईसप्लेट देवून टाक,
शाम म्हणाला देतो देतो,
२ मिनिटात घेवून येतो,
शामचा वादा झाला खोटा,
मग राम चिडला मोठा,
राम गेला रागाने धावून,
मालक घाबरला त्याला पाहून,
करा म्हणाला कामे झटपट,
राईसप्लेट बनवा लगेच पटपट,
भरा पोळी, भरा भाजी,
चपाती असावी गरम ताजी,
भजी तळून फुगवा ढम्म,
खाणाऱ्याचे पोट टम्म,
चटणी असावी चटकदार,
तोंडाला सुटावे, पाणी फार,
लोणचे इतके आंबट ढाण,
चाटून पुसून खावे छान,
पापड इतका कुरकुरीत,
खावा वाटे आवाज करीत,
भाज्यात दोन पर्याय असावे,
आवडेल तिला फस्त करावे,
टेबल असावा स्वच्छ क्लीन,
जणू तो वाटावा नवीन,
उशिरा का होईना, राईसप्लेट आली,
घ्या साहेब, गाडी निघाली,
पोटभर जेवून द्या ढेकर,
मग मागवा कोल्ड्रिंक हवे तर,
खोबरेबर्फी गोड गोड,
तिला आमच्या स्मितहास्याची जोड,
एकदा याल तर येत राहाल,
आमच्या शिवाय कुठे जाल,
गर्दीमुळे नसेल जागा,
तरी थोडा वेळ थांबा,
शेख कॅन्टीनची किमया न्यारी,
पडे भल्या भल्यांना भुरळ भारी

कवी विद्यानुज
बॉस

अशक्याला शक्य म्हणती,
मेहनत घेवून प्रत्यक्षात आणती,
प्रश्न विचारून कोड्यात टाकती,
विरोध करणारेही हो म्हणती,
कौतुकाचा वर्षाव अखंड,
ऐकणाऱ्यांना आनंदी आनंद,
सतत आणती नवीन कल्पना,
महिन्याकाठी बदल हवा ना,
पाहता क्षणी पडे प्रभाव,
वादविवादात ना कुणाचा निभाव,
बुद्धिवंत सल्लागारांचा हवा वावर,
अडता क्षणी, मदत घेवून सावर,
वेळ थोडा, कामे फार,
अडाण्यालाही करती तयार,
दोन विषयातील सबंध शोध,
कठीण विषय सोपा, सर्वांना बोध,
इमानदारांना देती संधी,
अशक्य उच्चारायला, इथे बंदी,
देशोदेशी येणे जाणे,
येता येता काम आणणे,
सकारात्मकता त्यांना पसंत,
आत्मविश्वास पाहून त्यांना आनंद,
उज्जल उद्याची, मोठी आशा,
त्यापाठोपाठ करोडोंची भाषा,
संकल्प त्यांनी, ठाम केलेला,
पाहती पेला, अर्धा भरलेला,
उत्तमाच्या पाठीवर थाप,
कामचुकारांच्या डोक्याला ताप,
कठीण समयी, घेती जबाबदारी,
युक्त्या सुचवती भारी भारी,
व्यक्तिमत्व रुबाबदार,
बोलायला हवी, छाती फार,
कामे हवीत, वेळेच्या आत,
रात्र दिवसाची, कशाला बात,
बॉस देवता, प्रसन्न होता,
पदोन्नतीचा सरळ रस्ता,
या सर्वातून, घ्या एक बोध,
जीवन स्वतःच्या, महानतेचा शोध
-    कवी विद्यानुज
बाळ-२
ऐटीत चाले, ऐटीत बोले,
जणू कार्यालयात, साहेब निघाले ||धृ||
बोलणे त्याचे, फार गोड,
युक्तिवाद, सारे बिनतोड ||
क्षणोक्षणी दादाशी स्पर्धा,
प्रत्येक गोष्टीत, हवा भाग अर्धा||
ओरडताच, रुसवा धरे,
चूक तुमची, त्याचे खरे ||
दुधवाल्या काकांना दरडावे,
सारे हिशोब, त्याला ठावे ||
गणपती बाप्पांना, करे प्रार्थना,
दर वर्षी, लवकर याना ||
कार्टून चित्रपटांचे, अति वेड,
त्यात जादूचे, हवे खेळ ||
कधी बेततो, धाडसीपणा,
पडे असा, कि लवकर उठवेना ||
जीव लावण्यात, ना सोडे तुट,
बनवे प्रत्येकाशी, नाते अतूट ||
ताटात अन्न, हवे सुटसुटीत,
मन भरून खावून, बने गुटगुटीत ||
व्यस्त दिनक्रमात, न मिळे सवड,
त्यातून भागवे, गप्पांची आवड ||
मित्र मंडळींची, संख्या मोठी,
वाटती सुख-दुखेः, छोटी मोठी ||
मोठ्या माणसांना, मारे मस्का,
चूक करताच, वा काही हवे असता ||
रूप त्याचे, राजबिंडे देखणे,
त्यात कपडे, फॅशनचे नमुने ||
गोकुळातील हा, कृष्णा खोडकर,
भेटेल त्याला, आपलेसे कर ||

खाणावळ

मुले थोडी येता,भाऊंची गडबड,
जेवता जेवता, पोरांची बडबड,
मुले थोडी, सोंगे फार
आमच्या पोटात, भुकेचा कहार,
मजा, मस्ती, धांगडधिंगा,
जेवता जेवता, करतो दंगा,
गप्पा रंगती, हातोहात,
एकेकाची मिळते साथ,
कुणाच्या फेका, खुशाल ऐका,
कुणी घेतला, राजकारणाचा ठेका,
कुठलाही विषय, ना इथे वर्ज्य,
त्यात माझा, कवितेचा अर्ज,
जेवणाबरोबर गोंधळही पचवा,
ज्ञान, मित्र, ओळखी वाढवा,
भेटू ना भेटू, आठवण असू दया,
माणुसकीची मनात, साठवण असू दया
-    कवी विद्यानुज (kavi vidyanuj)
सखी

दिलखुलास स्मितहास्याची झुळूक हवी,
प्रश्नार्थक नजरेची झलक हवी,
आयुष्यात आनंदाचा मोहर हवा,
सखे तुझ्या मैत्रीचा एक प्रहर हवा,
फुलाहून कोमल मन हवे,
निरागस चेहऱ्यावरचे भाव हवे,
स्नेहाची एक शिकवण हवी,
गमती जमतींची आठवण हवी,
पक्ष्यांसारखा किलबिलाट हवा,
हास्य विनोदाचा खळखळाट हवा,
जसा तेजस्वी सूर्य आसमंतात हवा,
तसा तुझ्या मैत्रीचा प्रकाश हवा,
उबदार थंडीची पहाट हवी,
तशी तुझ्या मैत्रीची लाट हवी,
मधाळ गोड आवाज हवा,
ऐकणाऱ्यांचा कान धन्य व्हावा,
मैत्रीला प्रेमाहून का कमी लेखावे,
त्याहून श्रेष्ठ मनाचे मनाशी नाते नसावे
संघर्ष


खूप झगडलो, खूप झगडलो, आव्हानांना त्वेषाने भिडलो,
खूप चुकलो, खूप शिकलो, पडलो पुन्हा पुन्हा उठलो ।। धृ ।।

स्पर्धेच्या प्रवाहात उतरलो, त्या धुंदीत वेडा ठरलो,
अपयशाच्या भयाने लटपटलो, यशाच्या मालिकांनी उद्धरलो ।।

मागल्यांच्या मानाने मोठा ठरलो, पुढल्यांच्या खिजगिणतीत ना गिनलो
अहंकाराच्या कोशात अडकलो, मीपणाच्या कोशात गुरफटलो ।।

पर्वताच्या  उंचीवर चढलो, धडपडून पुन्हा सावरलो,
दुःखात हसलो, सुखात रडलो, सुकलो आणि पुन्हा उमललो ||

कधी चिडकीने जिंकून हरलो, नियतीच्या तालावर फिरलो,
क्षुल्लक अडचणी पुढे अडखळलो, अगणित उणीवांसह जगलो ।।

धर्मशास्त्रांच्या आदेशांनी अडलो, न्यूनगंडांनी कधी पछाडलो,
सत्याच्या गर्भात शिरलो, अध्यात्माच्या वारीत फिरलो ।।

स्वार्थासाठी कुणा चिकटलो, कटू बोलून कुणा दुरावलो,
असंगाच्या संगतीत बिघडलो, नतद्र्ष्टांना पुरून उरलो ।।

व्यवस्थेकडून गेलो सतावलो,तिला न बदलता मीच बदललो,
ज्ञानाच्या कैफात वावरलो, सनकीपणे कुणालाही नडलो ।।

मानापमानांनी बिथरलो, टीका स्वीकारून सुधारलो,
प्रसिद्धीच्या लाटांवर मिरवलो, सामान्यागत गर्दीत हरवलो ।।

सत्याच्या श्वासांना भिडलो, नात्यांच्या बंधनात अडकलो,
प्रेमाच्या आभासात फसलो, मैत्रीच्या आधाराने सावरलो ।।
स्वतःच्या आयुष्याला, स्वतःपुरते मानू नये,
त्रास देणाऱ्या विषयांना, त्रास होण्याइतके ताणू नये,
क्षणभंगुर जीवनात, सारी दुःखे क्षुल्लक आहेत,
साऱ्यांना पुरून ऊरू, जोवर आपल्यांचे प्रेम शिल्लक आहे
- कवी विद्यानुज
कोणाचा दोष नव्हता कधी, अपघात होत राहिले,
पूर्व कल्पना असो वा नसो, आघात होत राहिले,
आले गेली माणसे, घर आबाद बरबाद होत राहिले,
साऱ्या आठवणी घेवून, जीवन पुढे जात राहिले
- कवी विद्यानुज
झिडकारून रक्ताचा गर्व, गीते नवी रचू पाहतो,
नाकारून भेदभाव सर्व, वाट नवी बनवू पाहतो,
दिखावू मानापमानाच्या, चिंता हव्या कशाला,
माणसांना माणसांपासून, तोडणाऱ्या परंपरा जपाव्या कशाला
- कवी विद्यानुज
अंतरीच्या वेदना, कविता बनून भेटल्या,
यमकांच्या शृंगाराने, मनमोहक भासल्या,
हसलो,रडलो,चिडलो,त्यांना कडकडून भेटलो,
स्वतःशी का होईना, मनमोकळे बोललो
- कवी विद्यानुज