Thursday, 20 February 2014


शिवजयंतीच्या दिवशी प्रवीण दवणे यांचे व्याख्यान ऐकण्याचा दुग्ध शर्करा योग काल जुळून आला.
जीवनोपयोगी संस्कार सकारात्मक आणि विनोदी शैलीत सांगून त्यांनी दोन-तीनशे श्रोत्यांना दीड तास खिळवून ठेवले. यातूनच त्यांची ताकद लक्षात येईल.

त्यांचे विचार थोडक्यात -

 जीवनात मनोरंजनापेक्षा भविष्याला अधिक महत्व दया.
 भाषेवरून भांडण्यापेक्षा प्रत्येक भाषा समजून उमजून तिचा आनंद घ्या.
 श्रीमंती हि केवळ पैशात मोजण्यापेक्षा अभिरुचीत मोजा.
 केवळ जगू नका, आनंदी जीवन जगा.
मन सदैव शोधते प्रेरणा,
नवी रचना करण्याची योजना,
रणरणत्या उन्हात सावली हवी,
प्रेम नको पण मैत्री हवी

कवी विद्यानुज

Friday, 7 February 2014

धमाल विनोदी कविता

प्रेमात पडला ससा

कोणास ठाऊक कसा,पण प्रेमात पडला ससा,
काय त्याची अवस्था, कमळात भुंगा जसा ।।
रस्त्याने दिसली सशीन टंच, मारली गाडीवर उडी उंच ,
मोडता पाय, प्लास्टर त्यावरी, ती न भेटायला आली घरी,
आता कळली चूक खरी, नाही ही पदधत बरी ||
तिच्या बाजूला टाकला रुमाल, म्हणे तुमचा असेल तर घ्याल,
ती न ऐकता, वेगाने कमाल, पुढे गेली, निघून खुशाल,
न चालली यावेळीही, युक्ती चित्रपटातली || 
हट्टाला पेटला ससा, छाप पाडतो पहा कसा,
त्याने केला रिकामा खिसा, आणला उंची आरसा,
मारून अत्तराची शिशी, म्हणे मी भवरा, ती मोगरा जशी, 
पुन्हा शिंकली माशी, ती दिसलीच नाही त्या दिवशी,
अशी झाली फजिती, ससा झोपला रात्री उपाशी ||
ठरवले आता सैन्यात जातो, अफाट शौर्य गाजवतो,
करून मेहनत सराव, केली नेमबाजीत सरशी,
भुईसपाट सारे शत्रू, गोळ्यांना पडले फशी
परत येता गावाच्या वेशी, किती वाढली होती कीर्ती ||
स्वागताला गाव गोळा, भरला सत्कारसोहळा, 
सशीन आली घेवून हार, हा छाती फुगवून तयार,
मी नाही असामी साधी, आहेस का लग्नाला राजी,
विशाल माझे मन अन हृदय, व्हावा प्रेमाचा अरुणोदय ||
सशीन हसली खट्याळ, हा नाही ब्लैक अन्ड व्हाईट काळ,
झाले अफेअर चार, करशील का माझा स्वीकार,
बरी वाईट चर्चा पंचक्रोशीत, खरे काय ते मलाच माहित,
मी आले एकविशीच्या काठी, गाव लागला माझ्या पाठी ||
ससा पडला विचारात, ही महामाया पडली गळ्यात,
तर लागेल आयुष्याची वाट, एकल्याने सुखी राहावे जगात ||
घेवून निरोप, स्वतःला सावरत,निघाला पुढे, चालत झटपट,
आठवडे गेले विना कटकट, एक दिवस दारावर टकटक ||
नाही ओळखले तुम्ही कोण, ती म्हणे प्रेमात गेली वर्षे दोन,
वाट पाहिली कळण्याची, हद्द झाली तुझ्या बुद्धूपणाची ||
सुंदरीच्या रूपापुढे झाकोळली माझी काया,
तुला नाही जमले, रूपापेक्षा मन बघाया,
अशी जमली जोडी योग्य, सशाचे फळफळले भाग्य,
साधा जीवनात लक्ष्य सर्वोत्तम, चालून येईल जे जे उत्तम ||
https://www.facebook.com/KaviVidyanuj
त्यांना परकियांनी, आम्हा स्वकियांनी छळले,
सत्ता संपत्ती धर्मांच्या, कुरघोडीत गेलो पिळले,
त्यांना नसे भीती, ठावूक भारतीयाची खुण,
सहनशीलता त्याचा, सर्वात मोठा गुण
--------------------------------------
एकाखेरीज साऱ्यांचे, प्रयत्न अपुरे पडले असतील,
आयुष्यभरासाठी रचलेले, मनातले मनोरे कोसळले असतील,
गुलाब कोमजल्याने फार मने हिरमुसली नसतील,
पण तिच्या लग्नाने किती हृदये तुटली असतील
--------------------------------------
दुधात पाणी, तांदुळात खडे,
तुपात डालडा, चहात पावडर,
नात्यागोत्यात,मैत्री, प्रेमातही भेसळ,
कोण कशासाठी जवळ, ओळखणे अशक्य केवळ

Kavi Vidyanuj
    ताईगिरी

किती बदलले जग, तरी आपले हळवे नाते,
राहो जवळ वा दूर, नाते अतूट राहते ।।धृ।। 

इवलेसे पाय लटपटताना, बोट धरून चालवलेस,
नवीन शब्द वाचताना, स्पष्टपणे वदवलेस ।।

समजावल्याने ऐकतो कसला, धाकटा असतो हट्टी,
किती वेळा झाली कट्टी, पुन्हा आपली गट्टी ।।

बालपणीच्या छोट्या जगात, सर्वात जवळ,
क्षणाक्षणाला काळजी करणारी,तूच केवळ ।।

सुट्टीच्या दिवशी, वाटून खायचो बिस्कीट खारी,
पिठलं असो वा भाकरी,तू समाधान मानणारी ।।

आई नसताना घरी, सारे सांभाळणारी,
स्वच्छ घर ओसरी, जेवण चविष्ट भारी ।।

जे घडल ते चांगल्यासाठी, आशावाद शिकवणारी,
मिळवून नेहमी यश, त्याला कमी मानणारी ।।

गणपती स्तोत्र, शुभं करोतीचे संस्कार,
होतो मातीचा गोळा, मिळाला आकार ।।

बेशिस्तीवर ओरडणारी,चुकल्यावर चिडणारी,
दिलीस संस्कारांची शिदोरी,निभावलीस जबाबदारी ।।

स्वतःच शोधलेस रस्ते, बनून समजूतदार कष्टाळू,
बरे वाईट दिवस गेले, राहिलीस मायाळू ।।

कुणी पाठीशी नसताना, धडपड परिस्थिती वळवण्याची,
मेहनत सतत करून, जिद्द करिअर घडवण्याची ।।

भांडून अनेकदा, नकळत दुखावलं असेल,
वाईट लक्षात ठेवणे, तुझ्या दुष्टीकोनात नसेल ।।

सगळ्या नात्यांना माणसांना, जपण्यात तुझे मोठेपण,
त्याने घराला घरपण आणि भावाला शहाणपण ।।

धडपडताना सावरुन, भरकटताना आवरून,
आयुष्यात किती वेळा, घेतलेस सांभाळून ।।

तुझ्या पंखांच्या छायेत, वाढलो भाग्यवंत,
मार्गदर्शन अन मायेने, झालो यशवंत ।।

झालो कितीही मोठा, तरी तुझ्यासाठी लहान,
ना सोडशील ताईगिरी, ओढत राहशील कान ।।
 
Kavi Vidyanuj
 आमची इग्नू

आमची इग्नू किती झकास,
सगळ्या विद्यापीठात खास,शिका इथे, साऱ्यांनी बिनधास्त,
विद्यार्थांवर खूप विश्वास ||धृ॥

आमचे विद्यार्थी,करती कष्ट,
आठवडाभर नोकरी, अभ्यासात व्यस्त,
अभ्यासक्रम कठीण, इच्छाशक्ती जबरदस्त 
चिकाटीने देती परीक्षा, वर्षानुवर्ष ||

वेबसाईट शोधा एक, सापडती हजार,
शोधाल ते सारे, तिथे तयार,
माहितीच्या महाजंजाळात काय पाहाल,
वाचता वाचता वैतागाल ||

एकीकडे कार्यालय,दुसऱ्या भागात विद्यालय,
परीक्षा असे, शहराच्या कोपऱ्यात,
शुल्काच्या बाबतीत, सर्वात स्वस्त,
तरीसुद्धा सगळी, व्यवस्था मस्त ॥

कधी कधी, होतात घोळ,
पुस्तके येण्याची, निघून जाते वेळ,
कुणाला विचारावा, अशा वेळी जाब,
भागवावे लागते, सॉफ्टकॉपीवर काम ॥ 
किती उशीर, का लवकर गेलात,
अभ्यास केला, वा नाही केलात,
तुमचा गणवेश कुठे गेला,
ना विचारती कारण कुणास||

अभ्यासाच्या नावाने, आमची बोंब,
इथे ना चाले, नुसते सोंग,
सुरुवातीपासून अभ्यासाचा, करा घाट,
नाहीतर परीक्षेत, लागते वाट ||
इथले शिक्षक, किती अनुभवी, 
उदाहरणासह विषय शिकवी,
काहीही प्रश्न, तुम्ही करणार,
त्याचे उत्तर, नक्की मिळणार  ||

यांच्या वेगाला, नाही तोड,
थिअरीला देती, प्रक्टिकलची जोड, 
वेगाने सर्व, अभ्यासक्रम पूर्ण,
जणू सुपरमैनचे, बाप अवतीर्ण ॥

यांच्या आंतरराष्ट्रीय शाखा,
विश्वस्तरावर मिळवली मान्यता,
जे न मानती, ते एक मूर्ख ,
ज्ञानाला माना, त्याविना गुणपत्रके व्यर्थ ॥

विना पाहता अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका,
मत बनवणे, योग्य आहे का,
तुरुंगात सुद्धा इग्नू पोहोचते,
माणसांना स्पर्धेसाठी सक्षम बनवते ॥ 

इथे सर्वांना, समान संधी हे खास,
हवी मेहनतीची तयारी आणि अट्टाहास,
ठरावा लक्ष्य, घ्या इग्नूत प्रवेश,
मिळेल जीवनात यश, हा हितोपदेश ॥ 


  बाळ

धावत राही, खेळत राही,
बाळ आमचा, थकत नाही
दिवसभर मस्ती, न थांबता करे, 
तरी रात्री कशी, पोळी न सरे॥ध्रु॥
छोटा भीम पाहण्यात प्रचंड आनंद,               
राक्षसांच्या भीतीने दरवाजे बंद,
टिव्ही पाहे, मन लावून,
पडती स्वप्ने, कार्टून पाहून॥

दोन दिवसात खेळणे जुने,
अनमोल त्याच्या कलेचे नमुने,
फावल्या वेळेत चित्रकलेची खोड,
जागा मिळेल तिथे रेषा ओढ॥

रागावल तर त्याची, रागाने आग,
माराल तर छेडतो शास्त्रीय राग,
शक्ती एकवटून रागाने पाही,
पुढल्या क्षणाला विसरून जाई ॥

कुस्ती खेळताना येई शक्ती अचाट,
प्रश्न विचारता, चालवी डोके भन्नाट
त्याच्या कल्पनाशक्तीची भरारी फार,
गोष्ट ऐकताच, करे नवीन तयार ॥

बागेत गेल्यावर करे धमाल,
आनंद ओसंडून वाहे कमाल,
मोठ्यांना घोडा बनवून स्वार,
अति मस्ती करताच आईचा मार ॥

आजारी पडल्यावर शक्ती गुल,
सदाफुलीचे सुकलेले फुल,
साऱ्या घराचे त्याच्यावर लक्ष,
होतो दोन दिवसात तंदुरुस्त ॥

आजी आजोबा लावती शिस्त,
शुभम करोतीला जोडे हस्त,
मोठ्या माणसांवर बारीक नजर,
नक्कल करण्यात ना सोडे कसर ॥

घाबरवे मारून, वाघोबाची डरकाळी,
बिलगे आई बाबांना, ते  येताच संध्याकाळी,
घरापासून शाळेत, तो सर्वाना हवा,
सर्व माणसाना, जोडणारा दुवा ॥

प्रत्येक गोष्टीत, शोधे गम्मत,
तुमची नजर हातातच करामत,
त्याच्यासाठी सगळे, होती लहान,
विसरून सारे, जीवनातले ताण ॥

जीवन आहे एकदाच, भातुकलीचा खेळ,
साजरा करायला,प्रत्येक क्षण योग्य वेळ,
तो जाणे केवळ,स्वतःचे तत्वज्ञान,
नसे ठावूक गडयाला, धर्म वा विज्ञान ॥

सगळ्यांना सतावून, राही गोजिरा,
प्रत्येक क्षण, सणासारखा साजरा,
हा दृष्टीकोन, आपल्यात येवो,
सारे दुःख-चिंता, पळून जावो ॥

मनात येईल ते, वाटेल तसे करे,
चूक कळताच, आईच्या कुशीत शिरे,
मानमरातब,स्वार्थ काही क्षण विसरा,
व्हाल सुखी, विना मिळता कुठला सदरा ॥

- कवी विद्यानुज
kavi vidyanuj

Saturday, 1 February 2014

 
 
खूप झगडलो, खूप झगडलो, आव्हानांना त्वेषाने भिडलो,
खूप चुकलो, खूप शिकलो, पडलो पुन्हा पुन्हा उठलो ।। धृ ।।

स्पर्धेच्या प्रवाहात उतरलो, त्या धुंदीत वेडा ठरलो,
अपयशाच्या भयाने लटपटलो, यशाच्या मालिकांनी उद्धरलो ।।

मागल्यांच्या मानाने मोठा ठरलो, पुढल्यांच्या खिजगिणतीत ना गिनलो
अहंकाराच्या कोशात अडकलो, मीपणाच्या कोशात गुरफटलो ।।

पर्वताच्या  उंचीवर चढलो, धडपडून पुन्हा सावरलो,
दुःखात हसलो, सुखात रडलो, सुकलो आणि पुन्हा उमललो ||

कधी चिडकीने जिंकून हरलो, नियतीच्या तालावर फिरलो,
क्षुल्लक अडचणी पुढे अडखळलो, अगणित उणीवांसह जगलो ।।

धर्मशास्त्रांच्या आदेशांनी अडलो, न्यूनगंडांनी कधी पछाडलो,
सत्याच्या गर्भात शिरलो, अध्यात्माच्या वारीत फिरलो ।।

स्वार्थासाठी कुणा चिकटलो, कटू बोलून कुणा दुरावलो,
असंगाच्या संगतीत बिघडलो, नतद्र्ष्टांना पुरून उरलो ।।

व्यवस्थेकडून गेलो सतावलो,तिला न बदलता मीच बदललो,
ज्ञानाच्या कैफात वावरलो, सनकीपणे कुणालाही नडलो ।।

मानापमानांनी बिथरलो, टीका स्वीकारून सुधारलो,
प्रसिद्धीच्या लाटांवर मिरवलो, सामान्यागत गर्दीत हरवलो ।।

सत्याच्या श्वासांना भिडलो, नात्यांच्या बंधनात अडकलो,
प्रेमाच्या आभासात फसलो, मैत्रीच्या आधाराने सावरलो ।।

कवी विद्यानुज