ताईगिरी
किती बदलले जग, तरी आपले हळवे नाते,
राहो जवळ वा दूर, नाते अतूट राहते ।।धृ।।
इवलेसे पाय लटपटताना, बोट धरून चालवलेस,
नवीन शब्द वाचताना, स्पष्टपणे वदवलेस ।।
समजावल्याने ऐकतो कसला, धाकटा असतो हट्टी,
किती वेळा झाली कट्टी, पुन्हा आपली गट्टी ।।
बालपणीच्या छोट्या जगात, सर्वात जवळ,
क्षणाक्षणाला काळजी करणारी,तूच केवळ ।।
सुट्टीच्या दिवशी, वाटून खायचो बिस्कीट खारी,
पिठलं असो वा भाकरी,तू समाधान मानणारी ।।
आई नसताना घरी, सारे सांभाळणारी,
स्वच्छ घर ओसरी, जेवण चविष्ट भारी ।।
जे घडल ते चांगल्यासाठी, आशावाद शिकवणारी,
मिळवून नेहमी यश, त्याला कमी मानणारी ।।
गणपती स्तोत्र, शुभं करोतीचे संस्कार,
होतो मातीचा गोळा, मिळाला आकार ।।
बेशिस्तीवर ओरडणारी,चुकल्यावर चिडणारी,
दिलीस संस्कारांची शिदोरी,निभावलीस जबाबदारी ।।
स्वतःच शोधलेस रस्ते, बनून समजूतदार कष्टाळू,
बरे वाईट दिवस गेले, राहिलीस मायाळू ।।
कुणी पाठीशी नसताना, धडपड परिस्थिती वळवण्याची,
मेहनत सतत करून, जिद्द करिअर घडवण्याची ।।
भांडून अनेकदा, नकळत दुखावलं असेल,
वाईट लक्षात ठेवणे, तुझ्या दुष्टीकोनात नसेल ।।
सगळ्या नात्यांना माणसांना, जपण्यात तुझे मोठेपण,
त्याने घराला घरपण आणि भावाला शहाणपण ।।
धडपडताना सावरुन, भरकटताना आवरून,
आयुष्यात किती वेळा, घेतलेस सांभाळून ।।
तुझ्या पंखांच्या छायेत, वाढलो भाग्यवं त,
मार्गदर्शन अन मायेने, झालो यशवंत ।।
झालो कितीही मोठा, तरी तुझ्यासाठी लहान,
ना सोडशील ताईगिरी, ओढत राहशील कान ।।
Kavi Vidyanuj
No comments:
Post a Comment